समाजविज्ञान अकादमी
दि. के . बेडेकर अभ्यासकेंद्र
आवाहन
पाहता पाहता एकविसाव्या शतकाचे आगमन होऊन दहा वर्षे उलटून गेली आहेत.
सरलेले विसावे शतक हे तिसऱ्या जगातील वासहातिक देशांची दास्यमुक्ती, निसर्गांच्या शक्तिंना आवाहन देणाऱ्या आण्विक आणि इलेक्ट्रऑनिक तंत्रज्ञानाची उपलब्धी, सहा कोटी लोकांचे शिरकाण करणारी दोन महायुद्धे, अभूतपूर्व मंदी, बेकारी व दारिद्र्य कामगार शेतकऱ्यांच्या सत्तेचा रशियामधील उदय आणि अस्त, आशियायी चीनचा ऐतिहासिक उदय, अशा कित्येक आर्थिक-सामाजिक-राजकीय-लष्करी घटनांचे साक्षीदार होते.
विसावे शतक नेमके कोणते संचित आपल्यासाठी ठेवून गेले? स्थल-कालाच्या मर्यादाच पुसून टाकणारे माहिती तंत्रज्ञान ? सूर्यमालिकांना गवसणी घालणारे आकाशयान? सट्टेबाज जुगारी भांडवलाचे थैमान ? कामगार शेतकऱ्यांना भविष्याचे कर्ते बनविणारे महाप्रकल्प की माणसांना सरपटायला लावणाऱ्या गरीबीच्या अंधारगुहा? केवळ बाजाराचे जागतिकीकरण की वैश्विक मानव समाजाच्या निर्मितीचे आश्वासन ? जागतिक तापमानवाढीमध्ये भाजून निघणारी माणसे व समुद्राच्या वाढत्या पाण्याखाली बुडणारी दिवाळखोर औद्योगिक संस्कृती ? साम्राज्यवादी सत्तेच्या मनमानी युद्धखोरीचे आक्रमण ?
नव्या तंत्रज्ञानांच्या-बाजारीकरणाच्या एखाद्या किल्लीने हे प्रश्न सुटतील की सामाजिक परिवर्तनासाठी अजून एका संगराची गरज आहे ? कारण पृथ्वीचे राजकीय नकाशे गेल्या शतकाने बदलले असले, तरी शोषणाचे अक्षांश-रेखांश कायमच आहेत.
मी-माझा नफा-मालमत्ता-सत्ता-चैन अन् चंगळ यांच्या हव्यासावर आधारित बाजारांचे जागतिकीकरण हेच मानवी संस्कृतीचे फलित आहे ?
नसेल, तर आजपर्यंत त्याला मांडले गेलेले पर्याय प्रत्यक्षात का आलेले नाहीत ? त्याचाही आत्मशोध घेण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर,एकविसाव्या शतकाच्या वास्तवाला भिडण्यासाठी, नव्याने सखोल अभ्यास आणि विचारविनिमय करण्याची गरज, कधी नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.
विसाव्या शतकातून बाहेर पडतानाच आपले वैचारिक नूतनीकरण व्हायला हवे होते. पण ते झालेले नाही. कारण सध्या समाजात माध्यमे, वृत्तपत्रे, विद्यापीठे,चर्चासत्रे, सभासमारंभ, यातून करोडो रूपयांचा चुराडा होत असला तरी, किमान सकस वैचारिकतेची पोकळी आहे. बुद्धिमंत म्हणविणारे आपापल्या नकली प्रतिष्ठा, पदे, आणि भरमसाठ पगार सांभाळत ओल्या पिंपातल्या क्षुद्र राजकारणात मग्न आहेत. तर संस्थांचे मालक चालक शिक्षणाचा ‘उद्योग ’ वेगाने वाढवत असल्याने शैक्षणिक दर्जाचा मात्र वेगाने ऱ्हास होत चालला आहे.
एका बाजूला समजात सर्व स्तरांमध्ये काही तरी नवे वाचण्याची, नवे शिकण्याची, वैचारिक आदानप्रदानाची अतृप्त भूक सतत दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला सर्वत्र उपभोगवादी-बाजारवादी चलनी नाण्याच्या खणखणाटामध्ये लोकांच्या वैचारिक सांस्कृतिक गरजांची घुसमट होते आहे. मग ती साहित्य संमेलने असोत, की माध्यमांमधील वाचाळ चर्चांच्या गचाळ कुस्त्या असोत.
महाराष्ट्रामध्ये बौद्धिक कुपोषण वाढत चालले आहे. वैचारिक गारठा निर्माण झालेला आहे. त्याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.
आणि ही कोंडी फोडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
ही पोकळी संपविण्यासाठी एक पाऊल म्हणून आपण एका नव्या उपक्रमाची सुरूवात करत आहोत. यासाठी समाजविज्ञान अकादमीने दि. के. बेडेकर अभ्यास केंद्राची स्थापना केली असून, त्याच्यातर्फे अभ्यासवर्ग घेतले जाणार आहेत. एक संवेदनशील व प्रगतीशील विचारवंत म्हणून महाराष्ट्र दि. के. बेडेकर यांना ओळखतो. एकविसाव्या शतकाचे संदर्भ घेऊन, त्यांच्या विचारातील मर्मग्राही तत्त्वनिष्ठा आणि संवेदनशील व्यापकता, यांचा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे.
हे केवळ वैचारिक चर्वितचर्वण किंवा झापडबंद पाठांतर नसेल. कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचे तिकिट इथे प्रवेशासाठी आवश्यक नाही. कारण कृतिशीलतेचे भान राखून ,
भारताच्या –जगाच्या भविष्याचा घेतलेला हा वैचारिक वेध असणार आहे. या अभ्यासवर्गांमध्ये
वर्तमानातील प्रश्नांच्या व उपलब्धींच्या प्रकाशात इतिहासाची राने तुडविली जातील. तर भूतकालातील अनुभवांचे किनारे पहात, भविष्याच्या महासागरात घालावयाच्या नावा बांधल्या जातील.
एका नव्या प्रकारची समाजाभिमुख ज्ञानसंस्कृती जोपासण्याचा हा संकल्प आहे. त्यासाठी समाजासाठी सर्वच स्तरातील कोणत्याही वयाच्या जिज्ञासू व्यक्ती, विद्यार्थी, कार्यकर्ते, अभ्यासक, शिक्षकदेखील शिकण्यास पात्र असतील. मार्गदर्शक व्याख्याते हे त्यांच्या क्षेत्रातील जाणकार अभ्यासक, अनुभवी शिक्षक किंवा कार्यकर्तेदेखील असतील. शिकणे आणि शिकविणे यातील सीमाच पुसून टाकणारा मनस्वी व जिवंत संवाद या अभ्यासवर्गातून होईल.
केवळ अभ्यासवर्गाचा खर्च भरून निघेल इतपत शुल्क आकारून, ते चालवण्याची योजना आहे. तरीदेखील अकादमीच्या जागेचे नूतनीकरण करून किमान नवी साधने आणावी लागणार आहेत. अभ्यासवर्गाच्या प्रशासकीय खर्चाच्या बरोबरच वक्त्यांच्या किमान प्रवासाचा खर्चाचीदेखील तरतूद करावी लागणार आहे.
आपल्यासारख्यांच्या कृतिशील नैतिक –वैचारिक- आर्थिक पाठिंब्यावरच अकादमी आजपर्यंत कार्य करत आली आहे. या नव्या उपक्रमातदेखील आपला अधिक भरघोस आधार मिळण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी आपल्याला हे आवाहन करत आहोत. त्याबाबतच्या तपशीलाची चर्चा करण्यासाठी अकादमीचे प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतीलच. परंतु त्याची प्रतीक्षा न करताच, आपणदेखील या उपक्रमात पुढाकाराने सहयोगी व्हाल याची खात्री आहे.
येत्या दोन वर्षांच्या काळात केंद्रातर्फे योजलेल्या अभ्यासवर्गांचा स्थूलमानाने तपशील खालीलप्रमाणे आहे.
1. पर्यावरण, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासाचे भवितव्य
(कालावधी- दोन महिने ,साप्ताहिक दोन दिवस, एकूण १६ दिवस ५६ घड्याळी तास )
· उर्जास्रोत, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि मानवी विकास यांचा परस्परसंबंध
· गेल्या २००वर्षांचा जागतिक औद्योगिक व्यापारी तांत्रिक इतिहास
· समकालीन जागितिक अर्थव्यवस्था आणि राजकीय सामाजिक वास्तव
· पर्यावरणाबाबत विविध सैद्धांतिक भूमिका
· पर्यावरणीय अरिष्ट, त्याबाबतच्या विविध भूमिका-पर्याय
· क्योटो, दोहा इत्यादी आंतरराष्ट्रीय परिषदा-करार-संकेत वस्तुस्थिती
· भारत सरकारचे पर्यावरण प्रदूषणविषयक धोरण-कायदे, वस्तुस्थिती
· वर्गीय चळवळी -पर्यावरण विषयक चळवळी आणि पुढील दिशा
- जागतिक व्यापार करार व –संस्थाचे वास्तव आणि भविष्याचा वेध
(कालावधी २ महिने, साप्ताहिक तीन दिवस- एकूण २४ दिवस -७२ घड्याळी तास)
- युरोपीय व्यापारी भांडवलाचा विस्तार –औद्योगिक भांडवलशाही, वसाहतवाद साम्राज्यवाद यांचा इतिहास (१४९२ ते १९१४)
- दोन महायुद्धे,आर्थिक मंदी-केन्सवाद,आर्थिक-राजकीय-वैचारिक परिणाम
- ब्रेटन-वुड्स परिषद-नाणेनिधी- जागतिक बँक- गॅट करार१९४६ ते १९८६
- गॅटकरार १९९४ निर्मिती- स्वरूप, समस्या आणि व्यवहार १९८६ ते २०१०
- आजच्या वित्त भांडवलाचा उदय-विस्तार-आणि सद्यःस्थिती १९७३ ते २०१०
- आर्थिक वित्तीय अरिष्टे १९९७ -२००८
- जागतिकीकरणाबाबत विविध सिद्धांत-भूमिका-चळवळी पुढील दिशा
3. एकविसावे शतक –तत्त्व चिंतन -विचारप्रणालींचा वारसा आणि साधने
(एकूण कालावधी- दोन महिने- –साप्ताहिक दोन दिवस-एकूण ५० घड्याळी तास)
· समकालीन आर्थिक –सामाजिक – राजकीय-व्यवस्था व तंत्रज्ञानाचे संदर्भ
· एकविसाव्या शतकातील विशेष तत्त्वज्ञानात्मक समस्या
· एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील प्रभावी राजकीय विचारप्रणाली (मुक्त भांडवलशाही, राष्ट्रवाद, मार्क्सवाद, अस्तित्ववाद)
· स्त्रीवाद- सखोल पर्यावरणवाद -उत्तर आधुनिकतावाद- -मार्क्सवाद
· एकविसाव्या शतकासाठी समाजपरिवर्तनवादी विचारप्रणालींची अनुभवनिष्ठ समीक्षा व दिशा-(जागतिक तसेच विशेष भारतीय संदर्भाने )
4. मानव आणि धर्म चिंतन
(कालावधी दोन महिने- साप्ताहिक दोन तास –एकूण ६५ घड्याळी तास)
· मानव आणि प्राणी फरक –आदिमानवाचे कल्पनाविश्व
· मानवी सामाजिक-आर्थिक विकासाची सर्वसाधारण सूत्रे
· धार्मिक कल्पनांची उत्क्रांती-विकास सर्वसाधारण सूत्रे
· प्राचीन भारतातील व जगातील ईश्वर व धर्म संकल्पना
· प्रमुख धर्मांच्या मूलसूत्रांची ओळख
· भारतातील मध्ययुगीन धर्मसंस्था
· युरोपातील धर्मसंस्था व आधुनिकता
· भारतीय तत्त्वचिंतनातील –सामाजिक-वैचारिक संघर्ष
· आधुनिक विचारवंतांचे धर्मविचार(गांधी -आंबेडकर)
· आधुनिक भारत - धर्म - –राजकारण
· एकविसाव्या शतकाच्या संदर्भात धर्मश्रद्धा आणि धर्मसंस्था यांचे मूल्यांकन
5. एकविसाव्या शतकातील कामगार चळवळ- भवितव्य आणि आव्हाने
(एकूण ३ सलग दिवस २० घड्याळी तास)
· भारतीय कामगारवर्ग विभाग- –संख्यात्मक- गुणात्मक स्थिती
· भारतातील कामगार कायद्यांचा-यंत्रणांचा मूलभूत ढॉंचा
· कामगार संघटना सांख्यिकीय स्थिती आणि कार्यपद्धती
· कामगार चळवळीचा उगम- इतिहास
· स्वातंत्र्य चळवळ आणि कामगार चळवळ
· भांडवलाचे व उद्योगांचे अर्थशास्त्र-जागतिकीकरण-बदलते तंत्रज्ञान- व्यापार-उद्योग
· कामगारांचा परात्मभाव, कार्यसंस्कृती,
· असंघटित कामगारांची सामजिक सुरक्षा वस्तुस्थिती - आव्हाने
· एकविसाव्या शतकातील कामगार चळवळीसमोरील आव्हाने
6. शिक्षणाचे अर्थशास्त्र
(एकूण कालावधी एक महिना साप्ताहिक २ दिवस एकूण ४५ घड्याळी तास )
· भारत-महाराष्ट्रातील शिक्षणाचा भौगोलिक सामाजिक शिक्षणपातळीनिहाय, संस्थात्मक प्रकारनिहाय विस्तार-रचना
· शिक्षणाची विद्यमान घटनात्मक रचना-शिक्षण हक्काची अंमलबजावणी
· शिक्षण अनुदानविषयक धोरणे
· विनाअनुदान तत्त्वाची पार्श्वभूमी-धोरण-शुल्कनिश्चितीबाबतचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल
· अनुदानित, विनाअनुदानित संस्थाचे खर्च-गुंतवणूक-उत्पन्न-अर्थकारण
· विनाअनुदान तत्त्वाचे सामाजिक परिणाम
· परदेशी विद्यापीठे-खाजगी विद्यापीठे यांची समीक्षा
· पुढील दिशा
___________________________________________________________________________
- वरील अभ्यासवर्गांसाठी व्याख्याते व मार्गदर्शक म्हणून त्या त्या क्षेत्रातील तज्ञ अनुभवी व अभ्यासू कार्यकर्ते आणि आवश्यकते प्रमाणे शासकीय अधिकाऱ्यानादेखील निमंत्रित करण्यात येईल . प्रत्येक विषयावर चर्चेसाठी वेळ ठेवला जाईल. अभ्यासवर्गाच्या शेवटी प्रत्येक अभ्यासार्थीला एका विषयावर निबंधाचे सादरीकरण करावे लागेल.
- पात्रता-
· विद्यार्थी -१२ उत्तीर्ण
· कार्यकर्ते-किमान २ वर्षांचा चळवळीतील कामाचा अनुभव
· जिज्ञासू व्यक्ती- वाचनाची आवड –शक्यतो पदवीधर
- शुल्क
· संस्था कंपनी- यांच्या मार्फत येणाऱ्यांसाठी –प्रत्येकी रूपये १०००/-
· सर्वसाधारण मिळवत्या व्यक्तीस प्रत्येकी रूपये ५००/-
· विद्यार्थी –प्रत्येकी रूपये २००/-
· चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रत्येकी १००/-
संपर्क-
समन्वयक / कार्यकारी विश्वस्त
समाजविज्ञान अकादमी
अक्षय चेंबर्स ,२१६ नारायण पेठ ,
केळकर रस्ता ,
पुणे ४११०३०.
No comments:
Post a Comment