1 मे महाराष्ट्र दिन-1 मे 2020…
मराठी राज्याची 60 वर्षे आणि आत्मभान हरविलेला
महाराष्ट्र
·
महाराष्ट्र – 10 कोटी मराठी भाषिकांचे मराठी राज्य !
·
देशातील 29 राज्यांपैकी एक !
·
देशाची सुमारे 10 टक्के लोकसंख्या !
·
आणि देशाच्या क्षेत्रफळापैकी 10 टक्के क्षेत्रफळ !
·
देशाची आर्थिक राजधानी !
·
औद्योगिकदृष्ट्या सर्वात पुढारेलेले राज्य! !
पण ही झाली महाराष्ट्राची
फक्त संख्यात्मक ओळख. एखाद्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये मिळणारी
महाराष्ट्राविषयी माहिती. पण आज महाराष्ट्रातील बहुसंख्य राजकीय नेत्यांना
महाराष्ट्राची या पेक्षा जास्त ओळख सांगता येणार नाही.
मग काय महाराष्ट्राची ओळख फक्त इथे संपते ?
महाराष्ट्राची ओळख या अशा सर्वेक्षण अहवालातच जर आटपता येत असेल, तर खरे म्हणजे
महाराष्ट्र राज्यासाठीचा एवढा प्रचंड लढा करण्याचे कारण तरी काय होते ? ज्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 15 नोव्हेंबर 1955 ते 31
जानेवारी 1956 या दोन महिन्यांत 105 माणसे पोलीसांच्या गोळ्यांना बळी पडली.त्यातील
99 जण तर मुंबईमध्ये टिपण्यात आली. कित्येक नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
तरीही अत्यंत लोकशाही मार्गाने, अहिंसक पद्धतीने, भारतीय राष्ट्रीय एकात्मतेला
थोडीही कसर न लागू देता हजारोंनी सत्याग्रह करून तुरूंग भरले !! महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांतील, विविध राजकीय विचारसरणीचे मराठी
भाषिक शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय,लेखक,कवी, शाहीर, बुद्धिमंत,छोटे उद्योजक आणि
जन्माने अमराठी पण महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झालेली गुजराथी, पारशी जनता या
सर्वांनी अत्यंत एकजूटीने सुमारे 14 वर्षे
सातत्याने हा संघर्ष केला. तो काही संख्यांमध्ये व्यक्त होऊ शकणाऱ्या नोंदींसाठी
नव्हे. किंवा देशात आणखी एका राज्याची भर घालण्यासाठी नव्हे.
कारण तो संघर्ष कोणा परकीय
सत्तेशी नव्हता. जमावाच्या मानसिकतेचा नव्हता.कोणत्याही भाषेचा किंवा भाषिकांचा
द्वेष हा त्याचा आत्मा नव्हता. भारतीयत्वाची प्रखर जाणीव त्यात होती. तरीही भारतीय
एकात्म राष्ट्रामध्ये मराठी जनतेने घेतलेला स्वतःचाच शोध होता. 1 मे 1960 रोजी
महाराष्ट्र फक्त नकाशावरच अस्तित्वात आला असे नव्हे. गेल्या 400 वर्षांत या समाजात
जी काही मूल्ये- विचार-आदर्श घेऊन जो इतिहास घडला, तोच मूर्त रूपात साकार झाला.
ज्या पद्धतीने हा संयुक्त महाराष्ट्राचा हा संघर्ष केला गेला, जे काही बोलले-ऐकले-घडविले
गेले ती केवळ एक भाषिकांची चळवळ नव्हती. तर तो एक सांस्कृतिक –राजकीय-वैचारिक
संघर्ष होता. त्यात जनता आणि तिची मूल्ये यांचा विजय झाला. पण हा झाला भूत काळ.
1960 नंतर काय झाले, आज काय होते आहे, आणि पुढे काय घडणार आहे, याचा विचार केला
नाही, तर हे केवळ स्मरणरंजन ठरेल.
महाराष्ट्र राज्यासाठी झालेला हा
संघर्ष समजण्यासाठी महाराष्ट्र नीट समजणे आवश्यक आहे. महाराष्ट्र काय आहे आणि
महाराष्ट्राचे कोणाकडून काय केले जाते आहे ?
हे समजण्यासाठी ही ओळख आवश्यक आहे.
ज्याप्रमाणे आपण ज्या
गावात राहतो,त्याचे स्थान, त्याचा निसर्ग,रचना आणि महत्व कळण्यासाठी कधी कधी गावाच्या बाहेर खूप
लांब उंच डोंगरावरून तो प्रदेश पहावा लागतो.त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे दर्शन
व्हायचे असेल तर, तर इतिहासाची जाणीव ठेऊन तो आपल्याला अखिल भारतीय पातळीवर जाऊनच
ते घ्यावे लागेल.
संत परंपरा -छत्रपती शिवाजी- प्रागतिक
दृष्टीचा उगम
चक्रधर, ज्ञानेश्वरांपासून
ते तुकारामांपर्यंत संतांच्या मांदियाळीने मराठी भाषेमध्ये भक्तीच्या मार्गाने
जनतेच्या भौतिक जगातील वेदनाच अध्यात्मिक भाषेत मांडली. इतक्या सत्ताहीन
वंचिततेमध्ये जगताना सामान्य बहुजनांना त्यांच्या अस्तित्वाचे वैश्विक भान दिले.
त्यांना व्यापक केले. निदान देवाच्या दारात आपण एक आहोत.असा आश्वासक सूर त्यांनी
आळवला,भावनिक पातळीवर आणि प्रत्यक्ष सांगितिक ओव्यांमधूनदेखील !
प्राकृतातून तत्त्वज्ञान प्रसवू शकते ह्याचे नवेच भान बहुजन समाजाला आले. दुसरीकडे
लाचारांच्या फौजेवर उभ्या जुलमी,अत्याचारी आणि एकछत्री मोगली
सत्तेच्याविरोधात शिवछत्रपतींनी
स्वाभिमानाची आणि न्यायाची धार लावलेली तलवार उभारली. जे देशात गेल्या 600 वर्षांत
घडले नव्हते ते त्यांनी घडवू दाखविले. ती केवळ सार्वभौमत्वाची घोषणा नव्हती, तर
रयतेच्या राज्याचा प्रत्यक्ष अंमल होता.
शिवाजी राजांच्या
मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजांशी कपटाने दगाफटका झाला.त्यांना कैद करून मारण्यात
आले. पण तरीही मोगलांच्या राज्याला जे आव्हान संभाजी राजांनी दिले त्यातून मोगली
साम्राज्य कधीच पूर्ण सावरू शकले नाही.औरंगजेब 16 वर्षे दिल्लीत जावू शकला नाही.
आणि त्याच्या मृत्यूनंतर तर मोगल
साम्राज्याला उतरती कळाच लागली.
नंतर मराठेशाहीची सूत्रे पेशव्यांकडे गेली. बाळाजी
विश्वनाथ,पहिल्या बाजीरावापासून ते इंदोरचे होळकर, ग्वाल्हेरचे शिंदे, धारचे पवार,
नागपूरचे राघोजी भोसले, या सारख्या सरदारांनी
मराठ्यांच्या सत्तेचा झेंडा अटक नदी ओलांडून दिल्लीपर्यंत आणि मध्य
भारताच्या पलिकडे पूर्वेला आजच्या ओरिसाच्या पार नेला. अटक नदीपासून ते कटक पर्यंत
आणि दक्षिणेकडे अर्काट पर्यंत ते पोचले.
अर्थात् छत्रपती
शिवाजी-संभाजी राजांच्या वेळी असणारी समत्व आणि न्यायबुद्धी तसेच व्यापक राजकीय
जाणीव मराठेशाहीत त्यांच्या पश्चात तशीच शाबूत राहिली नाही. सामाजिक स्वरूप बदलले.
उत्तर पेशवाईत तर ते विकृत पातळीला गेले. अतिभयंकर असे सामाजिक अत्याचार झाले.
व्यापक राजकीय जाणीव
पण तरीही राजकीय दृष्ट्या
1750 नंतर मोगल साम्राज्य नावापुरतेच होते आणि मराठे हेच दिल्लीचे कर्ते-करविते
होते.सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मराठ्यांनी दिल्लीमध्ये
केलेल्या हस्तक्षेपात परदेशी अहमदशहा अब्दालीपासून दिल्लीला आणि त्यातील भारतीय
साम्राज्याला वाचविण्याची दृष्टी होती.पानिपतची 1761 ची लढाई हे मराठ्यांनी या
व्यापक भूमिकेमुळेच खऱे तर ओढवून घेतलेले युद्ध
होते. कारण त्यामागे एक राजकीय दूरदृष्टी होती.यामुळेच बंगालमध्ये 1757
नंतर आपला अंमल बसवणारे इंग्रज त्यानंतरदेखील बरीच वर्षे मराठ्यांच्या सत्तेच्या
वाटेला जाण्याचे धाडस करू शकले नव्हते. नंतर मात्र अंतर्गत कलहांमुळे ही परिस्थिती
बदलत गेली.
देशाची सत्ता ब्रिटीशांनी
घेतली ती फक्त मोगलांकडून नाही, तर मराठ्यांकडून घेतली. ब्रिटीशांनी शेवटच्या मोगल
राजाला दिल्लीमधून ताब्यात घेण्यासाठी केलेली लढाई दौलतराव शिंदे या मराठी
सरदारासमवेत केलेली होती.
म्हणूनच ब्रिटीशांनी
राज्या ताब्यात येताच, महाराष्ट्रातील मराठी जनतेला आपण राज्यकर्ते असण्याची आठवण
देणारे आणि परकीय सत्तेविरोधात उठावाची प्रेरणा देऊ शकणारे गड आणि किल्ले अत्यंत
पद्धतशीरपणे कंत्राटे देऊन उध्वस्त केल्याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. मात्र असे
त्यांनी भारतात इतर राज्यांत केल्याचे दिसत नाही.
सामाजिक क्रांती आणि स्वातंत्र्य
चळवळीचा वैचारिक स्रोत
ब्रिटीशांचे राज्य स्थापन
झाल्यानंतर सामाजिक सुधारणेच्या चळवळीत तसेच स्वातंत्र्यांच्या राजकीय चळवळीत
महाराष्ट्राने वैचारिक तसेच संघटनात्मक नेतृत्व केलेले आहे. महात्मा फुले यांनी
शेटजी आणि भटजी यांच्या जुलुमी व्यवस्थेचा पर्दाफाश केला. शूद्रातिशूद्रांच्या
मुक्तिचे बीज पेरले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याचा वृक्ष वाढविला.
त्याची पाळेमुळे संपूर्ण देशात पसरली. छत्रपती शाहू महाराजांनी राज्य कारभारात जातिव्यवस्था मोडण्यासाठी
कोणती पुरोगामी धोरणे घ्यावीत याचा एक वस्तुपाठ घालून दिला.
काँग्रेसच्या स्थापनेपासून
ते भारतीय जनतेच्या असंतोषाचे जनक म्हणून
ज्यांचा उल्लेख केला जातो त्या लोकमान्य टिळकांपर्यंत, आणि सशस्त्र उठाव
करणाऱ्यांपासून ते श्रमिकांच्या राज्यासाठीच्या कम्युनिस्ट चळवळीपर्यंत महाराष्ट्राचा
नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे.महात्मा गांधींच्या चळवळीचे वैचारिक भाष्यकार
,त्यांचे प्रमुख धारकरी आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन भूदान, अस्पृश्यता निवारण
इत्यादी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मोहोळ महाराष्ट्रातच होते.
या अस्सल मुक्तिदायी
राजकीय-वैचारिक वारशावर उभ्या असणाऱ्या मराठी राजकीय संस्कृतीमुळेच
स्वातंत्र्यानंतर मराठी राज्याचा म्हणजेच महाराष्ट्रासाठीचा संघर्ष होऊ शकला.
अन्यथा भारतातील सर्व बड्या भांडवलदारांचे केंद्र असणाऱ्या मुंबईचा समावेश आकाशात
चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्रात होऊ देणार नाही, अशी वल्गना करणाऱ्या मोरारजी
देसाई आणि स.का पाटील यांच्यासारख्या नेत्यांचे काटे मोडून काढता आले.
मराठी राज्याचा लढा – स्वपरिचयाचा
मूल्याधिष्ठित संघर्ष
संयुक्त महाराष्ट्राचा लढा
म्हणजे महाराष्ट्राचा स्वपरिचयाचाच लढा होता.खरे तर कोणताही अटीतटीला येऊन
केलेल्या राजकीय लढ्यामध्ये पहिला संघर्ष स्वतःशीच करावा लागतो. नेहमीच प्रथम तसा
स्वतःशीच केला म्हणजे काय याची ओळख महाराष्ट्राचा खऱा परिचय होतो तो या मुक्तिदायी
राजकीय-वैचारिक संस्कृतीमधून. त्याचाच आज आपल्याला मागोवा घ्यायचा आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या
चळवळीत मराठी जनतेने केवळ आपले राज्य मिळविले असे नाही. तर त्या निमित्ताने जी
महाचर्चा देशात 1946 ते 1960 पर्यंत 14 वर्षे चालली त्यातून देशाला दाखवून दिले
की,
1.
भारत एक संघराज्य आहे. एकतंत्री केंद्रीय सत्ता नाही.
2.
भारतीयत्व हे बहुभाषिक सांस्कृतिक विविधतेतील एकत्वाचा
आविष्कार आहे.
3.
भारतातील
राज्ये ही नकाशावर मारलेल्या प्रशासकीय रेघोट्या नव्हेत. भाषिक संस्कृती ही
राष्ट्राचा मूलघटक आहे.राज्ये ही त्याचे मूर्त राजकीय रूप आहे.
4.
भाषावार राज्ये ही लोकशाही राज्यप्रणालीची चाके आहेत.
5.
स्थानिक –भाषिक –सांस्कृतिक- सामाजिक एकता ही विकासाची
प्रेरणा आणि पूर्वअट आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने
आपल्या तेजस्वी संघर्षातून हे पाच मुद्यांवर राष्ट्रीय मतैक्य घडविले. मुंबईसाठी
तसेच मराठी कामगार शेतकऱ्यांच्या राजकीय एकजूटीला कायमचा अटकाव म्हणून देशातील बडे
उद्योगपती एखाद्या पोलादी भिंतीप्रमाणे विरोधात उभे राहिले. पंतप्रधान पंडित नेहरूंसारख्या नेत्यावर दडपण
आणण्यात आले. अशा कितीतरी अग्निपरीक्षा देवून वैचारिक विरोधाच्या आणि पोलिसी
दमनाच्या निखाऱ्यांवर तावून सुलाखून निघूनच महाराष्ट्राची निर्मिती झाली. तो वर
दिलेल्या 5 मुद्यांचा नैतिक विजय होता. भारतीय घटनेतील मूलभूत तत्त्वांचा
पुनरुच्चार होता. समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र ही संयुक्त महाराष्ट्र
समितीची एकमताची घोषणा होती. म्हणूनच महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही एक
वैचारिक-राजकीय प्रभुत्व निर्माण करणारी चळवळ होती. ही भूमिकाच आहे महाराष्ट्राचा प्राण...आणि
महाराष्ट्राची आण !! तीच आहे महाराष्ट्राची गुणात्मक ओळख....
गेल्या 25 वर्षांत एका
बाजूस बाजारवादाने आणि दुसऱ्या बाजूस जात-धर्म यांच्या अस्मिताबाजीने आपल्या
संपूर्ण राजकीय वैचारिक विश्वाचाच ताबा घेतला आहे. शासनाने विकासाची कोणताही
जबाबदारी घेण्याचा प्रश्नच निकालात काढून टाकला आहे. शिक्षण आरोग्यापासून ते
औद्योगिक विकासापर्यंत आर्थिक सामाजिक जीवनाचे प्रत्येक क्षेत्र ही फक्त बाजारपेठ
म्हणून चालेल, त्यासाठी सरकारच्या सर्व संस्था, उपक्रम लवकरात लवकर बंद पाडण्यात
येतील असा जाहीरनामाच दिल्लीच्या सिंहासनावर कोरण्यात आला आहे.
गेल्या 5 वर्षांत तर
भारताची वाटचाल भारतीय घटनेच्या पुनर्लेखनाच्याच दिशेने सुरू आहे. खास करून
घटकराज्यांना केंद्राचे अंकित करून त्यांची अधिकाधिक आर्थिक-राजकीय कोंडी
करण्यासाठी सत्तेचा सरळ सरळ गैरवापर सुरू आहे. राज्य सरकारे ही ग्रामपंचायतीच्या
पातळीला नेऊन बसविण्यात येत आहेत. त्यांचा सतत अवमान करून त्यांना असहाय आणि लाचार
केले जात आहे. भारताची बहुभाषिक सांस्कृतिक ओळख आणि स्थानिक राजकीय नेतृत्व खरडून
काढण्यासाठी तेथे एकछापी धार्मिक प्रतीके, द्वेष, हिंसा, अत्यंत भ्रष्ट राजकीय
फोडाफोडी, एकतंत्री केंद्रीय नेतृत्वाची सत्ता यांनी राजकारणाचा ताबा घेतला आहे.
संपूर्ण वातावरण प्रदूषित केले आहे.
वरील 5 मुद्यांबाबत कोणते
अधःपतन आज देशात सुरू आहे, ते आपण समजावून घेण्याची गरज आहे. आपल्या संयुक्त
महाराष्ट्र लढ्यातील मूल्यांचे स्मरण करण्याची गरज आहे. महाराष्ट्राने आपले
गमावलेले आत्मभान मिळविण्याची हीच वेळ आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर
देशासाठी! देशाची
घटना वाचविण्यासाठी !!
वरील 5 मुद्यांपैकी एकेका
मुद्याचा विचार येत्या एका आठवड्यात दररोज करू या .....
महाराष्ट्र दिनाच्या आणि
आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
जनतेच्या सत्तेची ज्योत
जागती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र
भारती............
शेतकरी जमिनीचा एथल्या धनी
कामगार जनतेचा येथ अग्रणी
श्रमजीवी सत्तेची जेथ शाश्वती
गर्जा संयुक्त महाराष्ट्र
भारती......
भिन्न धर्म जातीची सर्व बंधने
तोडुनिया एकजीव जाहली मने
लोकयुगासाठी जिथे रक्त सांडती
गर्जा
संयुक्त महाराष्ट्र भारती.....
No comments:
Post a Comment